Skip to main content

व्हॉट्स अॅपमध्ये नवा बदल, व्हॉट्स अॅपवरून आता पाच वेळाच मेसेज फॉरवर्ड


                 देशभरात व्हॉट्स अॅपवरून पसरलेल्या अफवांमुळे मॉब लिचींग (जमावाकडून मारहाण) सारखे गंभीर प्रकार घटल्यानंतर केंद्र सरकारने व्हॉट्स अॅपवर टीका करत नोटीस बजावली होती. त्यानंतर पुन्हा दुसरी नोटीस बजावून सरकारने व्हॉट्स अॅपला फेक न्युज रोखण्यासंदर्भात तोडगा काढण्यास सांगितले. अश्या प्रकारच्या घटना घडल्यास त्या ज्या माध्यमांतून पसरतात, त्या माध्यमांवर देखील गुन्हा दाखल होऊन कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा केंद्र सरकारने व्हॉट्स अॅपला दिला होता.
                खोट्या अफवांना लगाम घालण्यासाठी व्हॉट्स अॅपतर्फे सकारात्मक पाऊले उचलण्यात येत आहेत. त्यामुळेच केवळ भारतीयांच्या  वापरातून एक फिचर काढून टाकण्यात आले आहे. शिवाय मेसेज पाठवण्याची मर्यादादेखील ठरवून देण्यात आली आहे.
                यापुढे व्हॉट्स अॅपच्या भारतीय युजर्सना एक मेसेज केवळ पाचच जणांना फॉरवर्ड करता येईल. एक मेसेज पाच वेळा फॉरवर्ड  झाला की कंपनी त्यावरचा फॉरवर्डचा आयकॉनच डिसेबल करणार आहे.


               भारतीय व्हॉट्स अॅप युजर्स जगातल्या अन्य कोणत्याही देशातील युजर्सपेक्षा अधिक फॉरवर्ड करतात, असं व्हॉट्स अॅपच निरीक्षण आहे. कंपनीचे जगभरात एक अब्ज युजर्स आहेत. यापैकी वीस कोटी युजर्स भारतात आहेत.
                'आज आम्ही मेसेज फॉरवर्डींगवर नियंत्रण आणण्याची चाचणी करत आहोत, जी प्रत्येक व्हॉट्स अॅप युजर्ससाठी करण्यात येणार आहे. त्यानंतर मीडिया मेसेज मधील फॉरवर्ड बटण डिसेबल होईल', अशी माहिती व्हॉट्स अॅपने आपल्या ब्लॉगपोस्टमध्ये दिली आहे.

Comments